Thursday, September 5, 2013

चले चलो.............


अजून एक हुलकावणी...अविस्मरणीय दिवस.. अविस्मरणीय कसला !! काळा दिवस..पण डोळे उघडणारा..

अरे तूम्ही दाखवू नका आपुलकी...नका करू प्रेम
देऊ नका मरताना मांडी
मेल्यावर खांदा
काहीच अपेक्षा नाहीय माझी तुमच्याकडून.. उरली नाहीय कुठलीही इच्छा..

जमलं तर इतकंच करा
निदान अविश्वास तरी दाखवू नका
वेदना नव्हत्या माझ्या कधी रचलेल्या
आणि खोट्या

इतकंच समजून घ्या.... अविश्वासाचे विशेषज्ञ बनण्याआधी....

तुमच्या त्या भावना तुमच्या त्या वेदना.. आणि इतर सगळे निर्जीव दगड..
तेल लावत गेली दुनिया आणि खड्ड्यात गेली लोकं तुम्हाला काय त्याचं...
मुखवटे घालू वावरा आणि जगा लेको तुम्ही निर्विकारपणे...
एकजात सगळे ढोंगी, स्वार्थी, नाटकी आणि दुटप्पी...तुमचं आयुष्य तुम्हालाच लखलाभ....

आता यापुढे कधीच आपलं नशीब, दैव, दुर्भाग्य असलं काही म्हणणार नाही.
जे मिळालं नाही ते आपलं नव्हतंच, असा डायलॉगही मारणार नाही.
जे होतं ते भल्यासाठी आणि जे होत नाही तेही भल्यासाठी... असला भिकारी खणखणाटही नकोच.

पण अपेक्षाभंगाचं वाईट वाटतंच. ते नाकबुल कशाला करा ?
बारक्या काडीवरती दिवास्वप्नांच्या माड्या बांधणं मात्र आता बंदच केलं पाहिजे.. कायमचंच, हे बरीक खरं...

अशावेळी भान, शुध्द हरपे पर्यंत.. जाणीवा, संवेदना नष्ट होई पर्यंत ढोसावी.. मूडद्यासारखं आडवं व्हावं..
आणि शुद्धीवर आल्यावर पाय दुखेस्तोवर वणवण चालून यावं, आता हाच एकमेव उपाय....

चले चलो.............

जीने कि आरजू में मरे जा राहे है लोग...
और मरने कि आरजू में जिया जा रहा हू मै....

अलविदा दोस्तो.. फिर कभी नही मिलेंगे....

Friday, August 23, 2013

वळून बघ तू एकदा मागे......

वळून बघ तू एकदा मागे... निघून जाण्याआधी..

काहीतरी अडवेल तुला नक्कीच, आपलीच एखादी आठवण साधी
नाही अडवलं तर, ती आठवण 'आपली' कशी ?
मग ती असेल फक्त एकट्या माझीच.

पूर्ण नाही काहीच... माहितेय मला,
पण
'अपूर्ण' हे सुद्धा एक अस्तित्व असतं,
म्हणून सांगतो,
अपूर्ण समूळ अदृश्य बनून राहण्याआधी,
वळून बघ तू एकदा मागे... निघून जाण्याआधी

इतिहास वाचलास की कळेल,
किनारा लाटांना कधीच अडवू शकला नव्हता... ना येण्यापासून ना जाण्यापासून
किनारा फक्त भिजतो... अगदी तळापर्यंत.
लाट गेली की सुकतो... तप्त उन्हाने
पण तळ तसाच राहतो... ओला
लाट पुन्हा येते... अन पुन्हा जाते सुद्धा.
कधी प्रेयसी बनून शांतपणे
तर कधी त्सुनामी बनून रणरागिणी सारखी रौद्रपणे

पण  निर्जीव किनारा असतो निशब्द निश्चल..
त्याला ना भूतकाळातून शिकता येतं
ना सुंदर भविष्याचं स्वप्न पाहता येतं
ना धड वर्तमानात जगता येतं...

कुणीतरी जाणार आहे हे माहित असूनही त्याच्या येण्याची वाट पहात शून्य शब्द होऊन तिथेच थांबून राहणं हे फक्त त्या निर्जीव किनाऱ्याकडून शिकायचं...........

Tuesday, August 20, 2013

एक व्यथा ............


डोळे मिटून घेतले
ओठही शिवून घेतले
श्वासही रोखून धरला
भावना मोकळ्या होऊ दिल्याच नाहीत
पण ....................
तरीही बंद पापण्या वाहू लागल्या
ओठही हुंदके देऊ लागले
श्वास हि थरथरू लागला
खोलवर धगधगलेला
ज्वालामुखी मात्र
कोणालाच दिसत नव्हता

निशब्द झाले सारे
आग ही थंड झाली
राखेतच त्या किती स्वप्न नष्ट झाली

किती स्वप्न नष्ट झाली .........

Thursday, August 15, 2013

गप्पा.



मनातल्या गप्पांना श्रोत्यांची गरज नसते.
वाटलीच गरज तर, हवे ते श्रोते हवे तेव्हा आणि हव्या त्या जागेवर बसवता येतात.
हव्या त्या श्रोत्याची, हवी तेव्हा आणि हवी ती दाद मिळवता येते.
या रंगमंचाचे कलाकार,कथाकार, निर्माता, निर्देशक....सगळे काही आपणच.

खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही वागत असली तरी, इथली सर्व पात्रं आपल्या मर्जीप्रमाणे वागतात.
हवं तेव्हा बोलतात, हवं तेव्हा हसतात, हवं ते ऐकतात. म्हणून इथे खोटं खोटं का होईना पण सुख अनुभवता येतं.
पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात ??? तिथे मात्र...
रिकाम्या खुर्चीपेक्षा अरसिक श्रोते जास्त त्रास देतात.

Monday, August 12, 2013

बेफाम मन

मनातल्या प्रश्नांच्या किचकट गाठी सोडवण्यासाठी माणूस नात्यांची गाठ थोडीशी सैल करून या गर्दीपासून लांब जातो.
कुठेतरी जाऊन शांत बसतो स्वत:त हरवलेल्या स्वत:ला शोधण्यासाठी.
स्वत:वर रागवलेल्या स्वत:ची समजूत काढण्यासाठी.
स्वत:चं स्वत:च मन भरून ऐकण्यासाठी.

हे सगळं इतकं किचकट कसं झालं ? झालं की आपणच केलं ?
पण स्वत:हून जाणूनबुजून करायला इथं दु:खावर कुणाचं प्रेम जडलंय ?

आपण मानलेली 'आपली माणसंही' कधीकधी पाठलाग करणं लगेचंच सोडून देतात, जणू काही वाटच पहात असावीत कधी एकदाची गाठ सैल होतेय या संधीची..

पण हे विचार मात्र आपला पाठलाग करणं का सोडत नाहीत ?

हवी असलेली नाती, नकोशी झालेली नाती, आधी हवी असलेली अन आता नकोशी झालेली नाती,

पडलेले प्रश्न, मिळालेली उत्तरं, पटलेली उत्तरं या सगळ्यांनी घेराव करून आपल्याला जाब विचारावेत आणि आपल्याकडे एकाचेही स्पष्टीकरण नसावे असे का व्हावे ?

आपल्याला वाटणारं जगासाठी चुकीचं असावं आणि जगाचे निर्णय नेहमी आपल्या विरोधातच असावेत हा नियमच आहे का आयुष्याचा ?
स्वत:चं आयुष्य स्वत:लाच इतकं परकं का वाटावं ?

शांत बसलेल्या शरीरात मन मात्र धावत असतं... बेफाम
वाटा संपतच नाहीत. त्या पसरतच जातात... द्रौपदीच्या साडीसारख्या.

अजूनही उरलेली वाट नजरेला दिसत असली की, मन जास्त अस्वस्थ होतं.
बेफाम धावत्या मनानंच जास्त थकायला होतं
आणि हे थकणं...
हे थकणंहि फक्त ज्याचं त्यालाच जाणवतं... आणि ज्याचं त्यालाच थकवतं....

Saturday, August 3, 2013

नियती.....



कधी कधी असं होतं की, मन जे सांगतंय ते कितीही खरं असलं आणि अशक्य नसलं तरी
आपल्यातलाच आपल्याच मनाचा एक भाग ते मान्य करायला तयार नसतं.
एक सांभाळताना दुसरं निसटत असेल तर, तेव्हा माणसाची खरी परीक्षा येते.
नियती हुशार असते. कोणत्याही परिस्थितीचे खापर स्वतःवर घ्यायला ती तयारच नसते.

कधीकधी आपल्यासमोर नियती पर्याय ठेवते. काय निवडावं हे आपल्या हातात असतं.
आवडलेलं, हवं असलेलं समोर असतं पण, निवडण्याची मुभा नसते.

नियती परिस्थितीतच अशी आणते की, पाय बांधून मोकळं रान देते आणि सांगते की, "जा, धावत जा."
पायातली बंधनं तोडून पुढे जाणं अशक्य नसतं.
पण ज्यासाठी बंधनं तोडावी, ते मृगजळ निघालं तर ? ही भीती असते.

पुढचा पश्चाताप टाळण्यासाठी आम्ही सध्याचा मनस्ताप निवडतो.

मनात आमच्या.....खूप काही मुरलेलं असतं....
खूप काही सांगूनही.....खूप काही उरलेलं असतं....
मन आमचे नकळत....कित्तीतरी गोष्टीसाठी झुरलेलं असतं..
आम्ही पुरवून घेतलेलं...जगाच्या नजरेत मात्र नेहमीच पुरलेलं असतं...