Wednesday, June 19, 2013

आठवणींचा पाऊस...

नुकतंच कुठं तरी वाचलंय मी,
'आठवणींच्या पावसात भिजून कोरडं राहायला हवं' वगैरे-वगैरे...
हे म्हणजे काही तरीच ऐकतोय मी नवं.
पाऊस कोरडा कसा असेल?
आठवणी कदाचीत कोरड्या असतील... ...
कदाचीत भावनाही असतील कोरड्या.
पण पाऊस मात्र असतो ओलाच...
भावनांचा असो की आठवणींचा,
पाऊस असतो ओलाच भिजवणारा चिंब-चिंब ओला
चिंब-चिंब ओलाच.

तुझ्या आनंदात भिजतो आहे....

सूर्याकडे एक निरोप दिला तुला देण्यासाठी अणि जरा विसावलो
तर चंद्र धावत आला तुझाच निरोप घेऊन ,
किनारयावरचं वारं थांबवलं म्हटलं तुझी चौकशी करावी
तर पायाखालच्या लाटांनी नाचत फेसाळत तुझीच खुषाली सांगितली, 
आत्ता पावसाकडे बघतो आहे,
तर त्यानिही बघितलं माझ्याकडे आणि ओळखिचं हसला,
" तुझ्यासारखं बरसणारं कोणी दिसलं तर सांग- 'मी आनंदात आहे' "
एवढाच तुझा निरोप त्यानी दिला ,
आणि माझं बरसणं सोबत घेऊन तो निघूनही गेला...
आता मी हसतो आहे माझं बरसणं सरलं ,
आता तुझ्या आनंदात भिजतो आहे.........